मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे समोरील मुख्य वर्दळीचा रस्ता खचला व त्याला तडे पडल्याची घटना बुधवारी घडली . आतील जलवाहिनी फुटल्याने ती बदलण्याचे काम सुरु करण्यात आले . आतील मोठी जलवाहिनी फुटून रस्ता खचल्याचे पालिकेचा बांधकाम विभागातून सांगण्यात आले तर रस्ता खचल्याने जलवाहिनी फुटल्याचा दावा पाणी पुरवठा विभागातून करण्यात आला.
भाईंदर पूर्वेला फाटक ते नवघर नाका हा प्रमुख रस्ता असून अतिशय वर्दळीचा रस्ता आहे . ह्या रस्त्यावरून लहान वाहनां पासून मोठी अति अवजड वाहने सतत येत - जात असतात . बुधवारी नवघर पोलीस ठाण्याचे समोरील रस्ता खचून एका कारची चाके त्यात रुतली . शिवाय मुख्य रस्त्यावर मोठे तडे पडले . पहाटे हा प्रकार घडल्या नंतर त्याठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले . सकाळी पाणी पुरवठा विभागाने जेसीबीने रस्ता खोदून आतील मोठी फुटलेली जलवाहिनी काढली व नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु केले . या मुळे येथील रहदारी व वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी झाली होती . रात्री पर्यंत सदर काम पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.
नवीन जलवाहिनी टाकून वरून माती टाकली असली तरी ती खाली बसल्या नंतर त्यावर डांबरीकरण करता येणार आहे . दरम्यान या प्रकरणी पालिकेच्या बांधकाम विभागात विचारणा केली असता आधी त्यांना सदर घटनेची माहितीच पाणी पुरवठा विभागाने दिली नसल्याचे समोर आले . तर रस्त्याच्या खालील मोठी जलवाहिनी फुटल्याने आत पाण्याची गळती होऊन माती खचून रस्ता खचला व तडे गेले असे विभागातून सांगण्यात आले.
तर पाणी पुरवठा विभागातून मात्र रस्ता खचल्याने जलवाहिनीवर अवजड वाहनांचा ताण पडून ती उभी फुटली आहे . जलवाहिनी अशी उभी फुटत नाही असे सांगण्यात आले . परंतु ह्या घटनेने काहीसे भीतीचे वातावरण होऊन वाहतूक कोंडी व त्रास लोकांना सहन करावा लागला . तर रस्ता नीट तयार केला नव्हता कि जलवाहिनी टाकताना सुरक्षेचा विचार केला गेला नाही ? असे प्रश्न केले जात आहेत . या प्रकणाची चौकशीची मागणी होत आहे .