मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये मुख्य रस्त्यांवर असलेल्या दुकानांमध्ये शुकशुकाट असताना दुसरीकडे फेरीवाल्यांकडे मात्र खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. दुकानाचे भाडे, खर्च , पगार भागवायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मीरा भाईंदर शहरातील बहुसंख्य लोकवस्ती सर्वसामान्य वर्गाची आहे. यातच, शहरात फळ - भाजी विक्रेत्या फेरीवाल्यांसोबतच कपडे, चादरी, चप्पल, स्टेशनरीपासून बहुतांश गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शिवाय भाईंदरमध्ये बेकायदेशीरपणे भरणारा रविवार बाजार आणि सोमवार बाजार रहदारी व वाहतुकीला प्रचंड अडथळा ठरूनही महापालिका आणि नगरसेवक मात्र कारवाई ऐवजी संरक्षण देत आहेत.
वाढत्या फेरीवाल्यांच्या जाचा मुळे केवळ रहदारी व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली नसून मुख्य रस्त्यांवरील दुकानदारांनासुद्धा यंदा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन आणि बिघडलेले आर्थिक गणित पाहता यंदा दिवाळी चांगली जाईल अशी आशा दुकानदार बाळगून बसले होते. परंतु फेरीवाल्यां मुळे दुकानदारांच्या आशा धुळीस मिळाल्या.
दिवाळी सणात दुकानात अपेक्षे प्रमाणे फारसे ग्राहक वळलेच नाहीत. दुकाने ओस तर फेरीवाल्यांकडे मात्र रस्त्यांवर खरेदीसाठी मोठी गर्दी होती. काहींची दुकाने मालकीची आहेत त्यांना भाडे भरायची गरज नसली तरी बहुसंख्य दुकानदार भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय करत आहेत. भाडे भरण्यासह दुकानांचा खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आदी विचारात घेता त्या तुलनेत व्यवसाय होत नाही.
लोकांना फेरीवाल्यांकडे खरेदी करणे स्वस्त वाटत असल्याने दुकानांकडे ते वळत नाहीत. फेरीवाल्यांना दुकानदारांसारखा खर्च नसतो शिवाय लोक वस्तू चांगली निघाली नाही तरी फेरीवल्याकडे तिचा परतावा मागण्यास जात नाहीत, असे नंदकिशोर बडगुजर म्हणाले.
भाड्याच्या दुकानात कपड्याचा व्यवसाय करणारे एस बाबूजी म्हणाले, दुकान भाड्याने घेऊन कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. माफक दरातले कपडे असूनदेखील फेरीवाल्यां मुळे आमचा व्यवसाय होत नाही. मग दुकान थाटण्या पेक्षा महापालिका, राजकारणी आदींना हप्ता देऊन फेरीवाला व्हायचे का? असा प्रश्नही त्यांनी केला.