मीरारोड - ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे . आयुक्तालय सुरु करण्यात खूप अडचणी असताना देखील आयुक्त सदानंद दाते यांनी गेल्या चार महिन्यात आयुक्तालय उत्तम रित्या सांभाळत चांगली घडी बसवली असल्याचे नगराळे म्हणाले .१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयचे उदघाटन करण्यात आले होते. आयुक्तालयाच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. अपुरे मनुष्यबळ , आयुक्तालय व नवीन पोलीस ठाणी , नवीन कार्यालये आदींसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरेशा नसताना देखील दाते यांनी आयुक्तालयाची घडी यशस्वी रित्या बसवण्यास घेतली आहे . नागरिकांच्या आयुक्तालया बद्दल असलेल्या अपेक्षा प्रमाणे कामकाज करून घेण्याचा प्रयत्न दाते यांनी चालवला आहे .पोलीस आयुक्तालय झाले तरी मीरारोडच्या राम नगर येथील मुख्यालयाच्या इमारतीत नियंत्रण कक्ष व आयुक्तालयाचे संकेत स्थळ तयार करण्याचे काम सुरु होते . सोमवारी त्याचे उदघाटन महासंचालकांनी केले . आधुनिक नियंत्रण कक्ष असून जीपीएस यंत्रणे मुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस मदत पाठवण्यास मदत होणार आहे.नगराळे म्हणाले कि , कोणतेही पोलीस ठाणे चालवण्यासाठी कर्मचारी अधिकारी हवेत. आपल्या ह्या नव्या आयुक्तालयात ४४ टक्के कर्मचारी - अधिकारी कमी आहेत . रिक्त जागा जास्त आहेत . हि कमी भरून काढण्यासाठी सध्या ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण मधून पोलीस बळ घेण्यासाठी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे . समिती महिन्या भारत कार्यवाही पूर्ण करेल . तसेच भरती किंवा बदलीने येणारे इच्छुक असतील त्यांना सुद्धा प्राधान्याने सामावून घेऊ.राज्यात पोलिसांची २० हजार पदे रिक्त आहेत . ती भरण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत . त्यात काही तांत्रिक अडचणी व न्याय प्रविष्ठ प्रकरण आहेत . पण लवकरच भरती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे . नवीन आयुक्तालय , युनिट सुरु करताना नवीन कार्यालये - पोलीस ठाणे साठी जागा , अधिकाऱ्यांना बसण्यास जागा , मनुष्य बळ अश्या बऱ्याच अडचणी असतात .आयुक्त सदानंद दाते यांनि गेल्या ४ महिन्यात आयुक्तालयाची चांगली प्रगती केली आहे . जोमाने काम सुरु आहे . आयुक्तालयाची सर्वच प्रक्रिया कार्यान्वित होईल . नवीन पोलीस ठाणी सुरु करण्याची तयारी सुरु आहे . आता पर्यंत काय काम झाले आहे याच आढावा आणि काय अडचणी आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे . महासंचालक कार्यालया कडून किंवा गृह विभागाच्या स्तरावर जास्तीत जास्त मदत लागेल ती लवकर देऊ असे नगराळे म्हणाले .
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 11:51 AM