मीरारोड : तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ऐन उन्हाळ्यात वादळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला. शहरातील सखल भागात अनेकांच्या घरात सांडपाणी शिरल्याने लोकांना मन:स्ताप झाला.
धुवाधार पाऊस बरसला. वीज आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. मुसळधार पावसामुळे शहरात जिकडेतिकडे पाणीच पाणी झाले. अनेक भागातील रस्ते, वसाहती व गावठाण भागात पाणी साचले.
मीरा भाईंदर शहरातील सखल भागात साचलेले पाणी लोकांच्या घरात शिरले. घरे व दुकानातील सामानसुमान भिजल्याने ते वाचविण्याकरिता तारांबळ उडाली. वादळीवारे व पावसामुळे लोकांनी घरातच राहणे पसंत केले. रस्त्यावरील वाहतूक तुरळक होती. पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा करणारे पंप महापालिकेने लावले होते. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान झाले. पालिकेची नालेसफाई सुरू असताना कोसळलेल्या पावसाने काढलेला कचरा व गाळ पुन्हा वाहून नाल्यात गेला.
नैसर्गिक खाड्या, ओढे यामधील अतिक्रमण तसेच बेकायदा भरावामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. शहरातील मोकळ्या पाणथळ व पाणी साठवून ठेवणाऱ्या भागातील अतिक्रमणांमुळे शहरांत पाणी साचले.
........
वाचली