मीरारोड - मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर नशेच्या व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर मीरा भाईंदर महापालिकेची कारवाई सुरूच असून पालिकेने मीरारोडच्या तीन हुक्का पार्लरच्या बेकायदा शेड व बांधकामे तोडली . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नशेचा धंदा चालवणाऱ्याची बेकायदा बांधकामे पडून टाकण्याचे आदेश दिल्या नंतर आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार , तंबाखू - सिगारेट - गुटखा विक्रीच्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पान टपऱ्या आदी तोडण्याची कारवाई केली .
मीरारोडच्या हाटकेश १५ क्रमांक बस स्टॉप व परिसरातील हुक्का पार्लर चालणाऱ्या बेकायदा बांधकामांवर पालिकेने कारवाई केली आहे . एआरएल क्रेविंग लाउंज येथील टेरेसवरील अनधिकृत वाढीव बांधकाम, डिवाइन शीशा लाउंज येथील अनधिकृत वाढीव बांधकाम आणि फॉरेस्ट रूफटॉप येथील शेड या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. पहाटे पर्यंत येथील हुक्का पार्लर मध्ये नशेचा धुमाकूळ चालत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते . पोलिसांनी देखील गुन्हे दाखल केले होते .
ह्या भागातील सोना लॉजिंग लेडीज बार येथे तळमजल्यावरील अनधिकृत वाढीव बांधकाम सुद्धा पालिकेने तोडून टाकले . अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग समिती ४ च्या सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले, कनिष्ठ अभियंता व पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली .