मीरारोड - महापालिका बसच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना पोलीस कोठडीत न ठेवता पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या खोलीत ठेवल्या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्याचा १ अधिकारी व नया नगर पोलीस ठाण्याचे ४ पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे . श्रीमंत व ओळखीच्या आरोपीची खास बडदास्त ठेवणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
११ फेब्रुवारी रोजी मीरारोड रेल्वे स्थानक जवळच्या चौकात उभी केलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्यावरून टॉप १० दुकानाचा चालक अनिल छेडा ( ३१ ) व त्याचा कर्मचारी बनारसी मिश्रा (३५) दोघेही रा . लक्ष्मी सोसायटी , विरार पश्चिम यांनी मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करत गोंधळ घातला होता . नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून छेडा व मिश्रास अटक केली होती.
दोघांना मीरारोड पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते . मात्र त्यांना कोठडीतून बाहेर काढून पहिल्या मजल्यावर नेऊन ठेवण्यात आले होते . या बाबतची तक्रार वरिष्ठां पर्यंत गेल्यावर चौकशी सुरु करण्यात आली होती . चौकशीत सदर प्रकार घडलेला असल्याचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले.
अहवाला नंतर अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी त्यावेळी कर्तव्यावर असलेले मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बोरसे व आरोपींची लॉकअप गार्ड म्हणून तैनात नया नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बाबुराव गरुड , विजेंद्र दिवेकर , कैलास ठोसर व रामेश्वर तारडे ह्या ५ जणांना पुढील आदेशा पर्यंत निलंबित करण्यात आले आहे . सदर पोलिसांनी संगनमत करून आरोपींना कोठडीत न ठेवता पहिल्या मजल्यावर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार उपनिरीक्षक बोरसे हे आधी नया नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांची आरोपी छेडा शी ओळख होती . बोरसे यांच्या सांगण्या नुसार त्या नया नगरच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना लॉकअप मधून काढून पहिल्या मजल्यावर नेले . अधिकाऱ्याने चुकीचे सांगितल्यावर कमर्चारी यांनी नाही म्हणण्याचे धाडस दाखवणे किंवा वरिष्ठांना तरी कळवणे गरजेचे होते.
वास्तविक नया नगर पोलिस ठाण्यात कोठडी नसल्याने आरोपीना मीरारोड पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवले जाते. मात्र त्या कोठडीच्या चाव्या ह्या मीरारोड पोलिसां कडे असतात . शिवाय ती मीरारोड पोलिसांची जबाबदारी असते . त्यामुळे कोठडी कोणी उघडून दिली व कोणाच्या सांगण्यावरून दिली ? यातील मीरारोड पोलीस ठाण्यातील संबंधित जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच अन्य दोषींवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .