मीरारोड - माजी भाजपा आमदार यांच्या मीरारोडच्या विनय नगर जवळील आपना घर फेस ३ च्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी वरून डोक्यावर दगड पडल्याने एका २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे . ह्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटदार वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे . तर या ठिकाणी पूर्वी देखील मृत्यूच्या घटना घडल्या असताना पोलिसांनी ३०४ कलम न लावल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
अपना घर फेज ३ ह्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे . सदर कंपनी हि भाजपाचे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांची आहे . शुक्रवारी दुपारी अपना घर फेस ३ येथील बांधकाम प्रकल्पात काम करणारा २२ वर्षीय डबलू ब्रिजलाल यादव ह्या मजुराच्या डोक्यात वरून दगड येऊन पडला . त्यात गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला . त्याला भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी डबलू याच्या भावाच्या फिर्यादी नंतर २४ मेच्या रात्री काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटदार वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला . सुपरवायझर व कंत्राटदार यांनी कामगाराच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपायोजना राबवली नाही व त्यांच्या सुरक्षे प्रति बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे डबलू यादव याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.
ह्या आधी सप्टेंबर २०२३ मध्ये अपना घर फेस ३ येथील बांधकाम ठिकाणी लोखंडी अँगल डोक्यावर पडून ४ वर्षांच्या सुभो सुधांशू दास व ६ वर्षांचा जयंत उर्फ जयंतो बच्चन दास ह्या दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता . त्यावेळी काशीमीरा पोलिसांनी महेंद्र कोठारी वर गुन्हा दाखल केला होता . तर फेब्रुवारी २०२४ मध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्या वरून पडून मुकेश सिंह मार्को ( २६ ) ह्या तेथे आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता.
सातत्याने याठिकाणी दुर्घटना आणि मृत्यू होऊन देखील सुरक्षेची काळजी न घेतल्याने आणखी एक बळी गेला असताना पोलीस मात्र जुजबी कलम लावून मालक वा लाभार्थी यांना आरोपी करत नसल्या बद्दल सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता , जिद्दी मराठा चे प्रदीप जंगम आदींनी नाराजी व्यक्त केली आहे .