मीरारोड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत लेडीज बार, लॉज वर कारवाईचे आदेश दिल्याच्या अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील ५ बारच्या वाढीव बांधकामांवर तोडक कारवाई केली.
मुख्यमंत्री यांच्या आदेशा नंतर मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार , लॉज आदींच्या अनधिकृत बांधकामां बद्दल आढावा बैठक घेतली . बैठकीत अधिकारी उपस्थित होते . ज्या ऑर्केस्ट्रा बार , लॉज ची बांधकामे पूर्णपणे अनधिकृत आहेत तसेच ज्यांची वाढीव बेकायदा बांधकामे आहेत त्यांची माहिती आयुक्तांनी घेतली . यावेळी काही ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज वर पालिकेने पूर्वी तोडक कारवाई केली असताना देखील काही पालिका अधिकाऱ्यांनी अश्या बेकायदा बांधकामांना दुरुस्ती परवानग्या दिल्या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेत अश्या परवानग्या रद्द करण्याचे आदेश दिले.
गुरुवारी दुपार नंतर आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त रवी पवार , पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड , प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे , नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे आदींसह पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने जेसीबी - पोकलेन च्या सहाय्याने मीरारोडच्या शीतल नगर येथील ऐश्वर्या , बिंदिया व टाइमलेस ह्या बार वर तसेच कनकिया नाका येथील अंतःपुरा बार आणि नया नगर मधील आर के इन बार - लॉज अश्या ५ बारच्या वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली गेली . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बार मधील बेकायदा पत्रा शेड , बार , किचन आदींची पक्की बेकायदा बांधकामे तोडण्यात आली . सदर कारवाई नियमित केली जाणार असून दुरुस्ती परवानग्या रद्द करून बेकायदा ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज सुद्धा तोडले जाणार असल्याचे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले . शहरात सुमारे १५० ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज असून त्यातील ३० ते ३५ बार - लॉज पूर्णपणे अनधिकृत आहेत . आयुक्तांच्या आदेशा नुसार कारवाई केली जाईल असे पवार यांनी म्हटले आहे.
शहरातील ऑर्केस्ट्रा बार आणि चद्दर बदलू लॉज मधून अनैतिक धंदे फोफावले असून ह्या कुंटणखान्या मुळे शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण बिघडून अनेक कुटुंब उध्वस्त होत असतात . त्यामुळे आपण ह्या आधी सातत्याने अनैतिक व्यवसाय व डान्स चालणारे ऑर्केस्ट्रा लेडीज बार आणि लॉज जमीनदोस्त करण्याच्या तक्रारी केल्या होत्या . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कारवाईचे आदेश दिल्याने महापालिकेने हे अनैतिक कुंटणखाने उध्वस्त करावेत असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले .