मीरारोड - सायबर लुटारूंनी टेलिग्राम द्वारे संपर्क करून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीतील ५ जणांची तब्बल ५९ लाख ४७ हजार रुपयांना फसवणूक केली आहे . त्यापैकी भाईंदरच्या एका तरुणीचे एकटीचे सुमारे ४० लाख तर एका व्यक्तीचे १२ लाख आहेत .
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदन मध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अनोळखी व्यक्तीने टेलिग्राम द्वारे संपर्क करत ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास बसल्या बसल्या चांगली कमाई होईल असे आमिष दाखवले . पार्टटाइम जॉब असल्याने चव्हाण सह हितेश बाबरीया व अन्य तिघांनी देखील ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सुरवात केली . सुरवातीला काम केल्याचे काही पैसे देण्यात आले . नंतर मात्र टास्क म्हणून गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी देखील आणखी पैसे भरण्याची मागणी होऊ लागली . नंतर मात्र पैसे मिळाले नाहीत म्हणून फसलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली .
निकिता चव्हाण यांची सुमारे ४० लाख रुपयांना फसवणूक झाली आहे तर हितेश बाबरीया यांना सुमारे १२ लाखांना फसवले आहे . या शिवाय अन्य तिघांची सुद्धा फसवणूक केली आहे . पोलिसांनी ह्या ५ जणांच्या फसवणुकीचा एकत्र गुन्हा दाखल करून घेतला आहे . गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय केदारे हे करत आहेत .