मीरारोड - "फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्राम" अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलाकडून आयोजीत ५ कि.मी. च्या दौड मध्ये पोलीसां सह त्यांच्या नातलगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला व पुरुष गटात पोलिसांपेक्षा त्यांच्या नातलगांनीच अव्वल क्रमांक पटकावला.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी च्या स्थापनेस ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमीत्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतुन देशात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते राधास्वामी सत्संग मार्ग , मीरारोड रेल्वे स्थानक पश्चिम व पुन्हा बोस मैदान अशी ५ किलोमीटर अंतर ची दौड आयोजित करण्यात आली होती.
पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दौड मध्ये अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रकाश गायकवाड तसेच इतर वरीष्ठ अधिकारी सह पोलीस दलातील ५४८ पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईकांनी सहभाग घेतला. सदर दौड मध्ये महिला गटात प्रथम क्रमांक कृतीका वाघमारे हिने तर द्वितीय क्र. हवालदार रेश्मा कुटे व तृतीय क्र. उपनिरीक्षक सारिका वाघचौरे यांनी पटकावला. कृतिका ही पोलिस शिपाई रुपाली बरफ यांची बहिण आहे.
पुरुष गटामधुन निर्भय किणी ह्याने अव्वल क्रमांक पटकावला. द्वितीय क्र. अमेय गाणेकर तर तृतीय क्र. हवालदार रंजित बंगे यांना मिळाला. पहिला क्रमांक पटकवणारे निर्भय किणी हे देखील शिपाई रुपाली बरफ यांचे बंधू आहेत. तर अमेय हा हवालदार नारायण गाणेकर यांचा मुलगा आहे. विजेत्यांना अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.