मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ले परिसरात मद्यपान, अमली पदार्थ सेवन, धूम्रपान सुरूच आहे . पोलिसांना काही सापडत नसले तरी किल्ला प्रेमींनी गांजा बाळगणाऱ्यास पकडून दिले आहे.
धारावी किल्ल्यावर चालणाऱ्या मद्यपान, धूम्रपान व गांजा सेवनाच्या प्रकारांची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत पोलीस व महापालिकेस आदेश दिले आहेत . या ठिकाणी पालिकेने सीसीटीव्ही बसवले मात्र त्याचे नियंत्रण ठेवले जात नाही . तसेच कांदळवन तोड प्रकरणी पोलिसांनाफुटेज मिळाले कि नाही ? हे अजून समजलेले नाही . या ठिकाणी कोणी सुरक्षा रक्षक वा पोलीस नसल्याने परिसरात उघडपणे व्यसनींचा अड्डा रंगत आहे.
धारावी किल्ला संवर्धन समितीचे कार्यकर्ते असलेले विशाल जाधव , विनोद देसाई , उल्हास खंडेराव , सतीश दरजी हे रविवारी रात्री पाहणी साठी आले असता त्यांना दोघेजण संशयास्पद सापडले . त्यांनी कळवल्या वरून समितीचे रोहित सुवर्णा यांनी पोलिसांना कळवले . उत्तन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड हे पोलिसांसह घटनास्थळी आले असता त्यापैकी यग्याक ग्यानेश श्रीवास्तव ( २५ ) याच्या कडे ६० ग्राम गांजा मिळून आला . त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या ठिकाणी मद्यपी - गर्दुल्ले यांचा राबता सुरूच असून पोलीस बंदोबस्त ठेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी सुवर्णा यांनी केली आहे .