मीरा रोड : मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील दुकान फोडून त्यातील चार लॅपटॉप व साडेचार हजार रुपये रोख शोरूम पळवणाऱ्या तीन नेपाळी रखवालदारांच्या टोळीपैकी एकाला आठ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रामदेवपार्क येथील समृद्धी संकुलाजवळ सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. १९ जूनरोजी पहाटे चारच्यासुमारास हे दुकान फोडून ४ लॅपटॉप व ४५०० रुपये रोख अशी घरफोडी झाली होती. मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगताप, पोलीस नाईक संतोष पाटील, विजेंद्र दिवेकर, विलास गायकवाड व पोलीस शिपाई अतुल गोसावी, सतीश निकम यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने तपास करत अवघ्या आठ तासांत क्षेत्रप्रसाद जोशी (वय ३२) या नेपाळी रखवालदारास अटक केली. त्याच्याकडून चोरी झालेली ४५०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे; तर फरार दोन नेपाळी रखवालदार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीचे चार लॅपटॉप या दोघांकडे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.