Mira Road Crime : मीरा रोड येथील एका खासगी कंपनीतील ३० वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. भाईंदरच्या लॉजमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वडिलांनी गेल्या आठवड्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तरुणाने आत्महत्येचे टोकाचं पाऊल उचललं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लॉजमध्ये धाव घेऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातून त्यांना कोणतीही माहिती न देता आठ लाख रुपये काढले होते. वडिलांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या फोनमधून एक व्हिडिओ जप्त केला ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांची माफी मागितली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बँकेत काही चुकीचे व्यवहार झाल्याचे लक्षात येताच व्यापारी असलेल्या वडिलांनी मुलाकडे याबाबत चौकशी केली. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर वडिलांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तरुणाची हरवल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर २४ जुलै पोलिसांना जया महल लॉजमध्ये एका खोलीत तरुणाचा लटकलेला मृतदेह सापडला. वडिलांनी मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे ओळखले. तपासादरम्यान, तरुणाने यापूर्वीही वडिलांच्या खात्यातून ४ लाख रुपये काढल्याचे पोलिसांना आढळून आले. आत्महत्येच्या आधीच्या घडलेल्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याचा फोन आणि इतर सामान ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची आत्महत्या
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना काशिमिरा येथे घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी १७ वर्षांची असून उत्तरप्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील फुलपूर तालुक्यात राहणारी आहे. गालिब शेख (२०) या तरुणाने तिला फूस लावून काशिमिरा येथे आणले. पेणकर पाडा येथील एका खोलीत ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केली.