मीरारोड - वडिलांचे सुमारे १२ लाख रुपये परस्पर खर्च केल्या नंतर वडिलांनीच मुलाविरोध पोलीस तक्रार केली . त्या नंतर मुलाने व्हिडीओ वर चुकीची कबुली देत भाईंदरच्या हॉटेलात गळफास घेऊन जीवन संपवलं .
मीरारोडच्या रामदेव पार्क भागात राहणारा विकास सिंग ( वय ३० वर्ष ) ह्याने भाईंदर पूर्वेच्या बंटास बार वरील जया महल लॉजिंग मधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार २४ जुलैच्या सायंकाळी उघडकीस आला होता . नवघर पोलिसांनी या बद्दल अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला .
विकास हा एका खाजगी कंपनीत कामाला होता . पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार विकासचे वडील प्रकाश हे त्यांच्या व्यवसायाचे पैसे बँक खात्यात जमा करत असत . परंतु विकास याने वडिलांना न सांगता परस्पर सुमारे ८ लाख रुपये कडून खर्च केले . ह्या आधी देखील विकास याने सुमारे ४ लाख रुपये परस्पर घेतले होते . ह्या घटने नंतर विकासाच्या वडिलांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती .
तेव्हा पासून विकास हा घरी गेला नव्हता तसेच मोबाईल सुद्धा बंद येत असे . विकास बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पण नोंदवली होती . परंतु पोलिसांना त्याचा शोध लागत नसतानाच विकास ह्याने नवघर पोलीस ठाणे हद्दीतीलच लॉज मध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले . विकासाच्या मोबाईल मध्ये त्याने आत्महत्ये आधी केलेला व्हिडीओ सापडला असून त्यात त्याने आपली चूक कबूल केली . विकासने वडिलांचे पैसे नेमके कुठे खर्च केले ह्याचा देखील पोलीस तपास करत आहेत .