लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाईंदर व मीरा रोड रेल्वेस्थानकात अत्यावश्यक सेवेच्या ओळखपत्राआड मोठ्या संख्येने लोक नाईलाजाने लोकल प्रवास करत आहेत. परंतु प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांकडून मास्क घातला जात नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
मीरा रोड व भाईंदर ही शहरातली दोन रेल्वेस्थानके असून, शहरातील बहुसंख्य नागरिक आपल्या कामकाजासाठी लोकलने प्रवास करतात. कोरोना संसर्गामुळे लोकल प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ठेवला असला तरी खोटी ओळखपत्र बनवून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बहुतांश बनावट ओळखपत्रे ही खासगी रुग्णालये, औषध पुरवठादार, औषध दुकाने, बँकिंग सेक्टर क्षेत्रातील आहेत. बनावट ओळखपत्र बनवून देणारेही सक्रिय असून, दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन ओळखपत्र बनवून दिली जातात, असे सुत्रांकडून सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात रेल्वेचे तिकीट तपासणीस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आदींनी अनेकांकडून बनावट ओळखपत्रे जप्त करून वरिष्ठ कार्यालयास पाठवून दिली.
सध्या प्रवास करणाऱ्या प्रत्येकी पाच प्रवाशांपैकी तीन जणांची ओळखपत्रे संशयास्पद असल्याची शंका असली तरी काटेकोर तपासणी करणे अवघड असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लोकांचा नाईलाज असल्याने आम्हालासुद्धा माणुसकी म्हणून सौम्य भूमिका घ्यावी वाटते. तरीही दंड आकारण्याची आम्ही कारवाई करत असतो, असे तो म्हणाला.
मास्क नसल्यास कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. परंतु महापालिकेचे पथकच येत नसल्याने विनामास्क प्रवाशांवर कारवाई ठप्प पडली आहे. त्यामुळे विनामास्क प्रवासी मोकाट असून, कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. पालिकेचे पथक असायचे तेव्हा त्यांच्या सोबत राहून विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. पण आम्हाला अधिकार नसल्याने आम्ही मास्कची कारवाई करत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
काही प्रवाशांकडे विचारणा केली असता आमची ओळखपत्र ही खरी असून, कोरोना नियमांचे पालन करूनच प्रवास करतो. एकाने मात्र, बसचा प्रवास परवडणारा नाही आणि लोकल प्रवासाशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजगार टिकवून ठेवला नाही तर कुटुंब जगणार कसे ? धोका पत्करून लोकल प्रवास करतोय. रेल्वे कर्मचारी व अधिकारीही सामान्य माणसाच्या व्यथा समजून कठोरपणे वागत नाहीत.