मीरारोड - घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे चेणे येथील लक्ष्मी नदीचे पाणी ३ बंधारे बांधून अडवण्याचे व पाण्याची टाकी बांधून त्या पाण्याचा उपयोग परिसरातील नागरिकांसाठी करण्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरां मधून येणारी लक्ष्मी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. पावसाचे पाणी हे नजीकच्या खाडी व समुद्रात वाहून वाया जाते. सदर पाणी अडवून त्याचा वापर परिसरातील नागरिकांना व्हावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे चालवली होती. याबाबत मंत्र्यांकडे ३ वेळा बैठका झाल्या. अखेर कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे ३ सिमेंट गेटेड काँक्रिट बंधारे मंजूर करण्यात आले. वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. जल संधारण विभाग हे काम करणार आहे. सुमारे १ कोटी ६२ लाख खर्च येणार आहे.
सदर पाणी पुरवठा योजनेसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. भूसंपादन पूर्ण करून तेथे पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तयार केली जाईल. टाकी व पंप रुम आदींसाठी पालिका अडीज कोटी खर्च करणार आहे. बंधाऱ्यात अडवलेले पाणी आजूबाजूच्या लोकांना दिले जाणार आहे.
आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, जल संधारण विभागाचे मिलिंद पालवे आदींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी शहर अभियंता दिपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ६ महिन्यात ही कामे पूर्ण करून ३ दशलक्ष लिटर पाणी आसपासचे आदिवासी, भूमिपुत्र , शेतकरी यांना मिळणार आहे . बंधाऱ्यां मुळे जंगलातील वन्यजीवांना पाण्यासाठी नागरी भागात भटकावे लागणार नाही असे आ. सरनाईक यांनी सांगितले .
पर्यटन व रोजगाराच्या अनुषंगाने लक्ष्मी नदी किनारा विकास करण्याची संकल्पना आहे. चेणे पूल पासून ते येऊर डोंगरा पर्यंत रिव्हर फ्रंट योजना आहे. यासाठी सल्लागार कंपनीने डिजाईन तयार केले आहे. एकूण १०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातील ५० कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. नदी किनारी उद्यान आदी विकसित केले जाईल. रिव्हर फ्रंट विकासचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.