ठाणे : कुख्यात गुंड सुरेश पुजारी याचा हस्तक मिरचु शर्माला (५१) ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी उल्हासनगर येथून अटक केली. खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारी याने एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शर्माला अटक केली असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मोक्कोंतर्गत गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आला होता. तसेच त्याला येत्या १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.उल्हासनगरातील व्यापाºयाला १९ आणि २० एप्रिल २०१८ या दोन दिवसात परदेशातून सुरेश पुजारीने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन केला होता. त्यावेळी मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याचदरम्यान तपासात मिरचु हा उल्हासनगरातील व्यापाºयांची माहिती पुजारीपर्यंत पोहोचतो ही बाब पुढे आल्यावर शुक्रवारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने त्याला अटक केली. या अटकेनंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्यावर न्यायालयाने त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे कोथमिरे म्हणाले.पुजारी उल्हासनगर येथे व्हीडिओ पार्लर चालवत असताना त्याच परिसरात मिरचुचे घर होते. तेथून दोघांची ओळख झाली. त्यानंतर उल्हासनगरातील प्रतिष्ठीत लोकांची बारीक-सारीक माहिती गोळा करून तो त्याला द्यायचा. तिच्या आधारे पुजारी व्यापाºयांना फोन करून धमकावत होता. तसेच मिरचुवर उल्हासनगर येथे खूनाच्या गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक होऊन मोक्कोंतर्गत कारवाई झाली होती. याच गुन्ह्यांत पाच ते सहा महिन्यापूर्वी तो जामिनीवर बाहेर आला. उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथेही खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. बदलापुरात आर्मस् अॅक्टनुसार गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुजारीचा हस्तक मिरचु शर्मा उल्हासनगरातून गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 4:53 AM