ठाणे : ख्रिसमस हा आनंदाचा सण आहे. तो साजरा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. त्यातील एक प्रकार म्हणजे त्याग. यंदा त्याग हीच संकल्पना पोप यांच्याकडून आली असून, या त्यागावर आधारित यंदाचा सण साजरा होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदा कार्यक्रम साजरे न करता, आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करावा,असे आवाहन ख्रिस्ती बांधवांना केले आहे.सर्व धर्मांनी एकत्र येऊन ही रोगराई आटोक्यात आणणे ही काळाची गरज आहे. जेव्हा या रोगराईवर विजय मिळवू तोच खरा आनंद असेल. त्यामुळे २४ आणि २५ तारखेला चर्चमध्ये होणारी मीसा ही ऑनलाइन होणार आहे. चर्च हे केवळ दोन तास खुले ठेवले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाला तारखा निश्चित केल्या आहेत. सकाळी ९ ते ११ यावेळेस चर्चमध्ये प्रार्थनेसाठी परवानगी दिल्याचे फादर ग्लॅस्टन गोन्साल्व्हिज यांनी सांगितले.
प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्यासाठीचे द्वार वेगवेगळे ठेवले आहेत. आत आल्यावर तापमान तपासून मग पुढे सॅनिटायझर, तसेच हात धुण्याची व्यवस्था केली आहे. मास्कशिवाय आत कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, तसे फलकही लावले आहेत.- फादर ग्लॅस्टन गोन्साल्व्हिज, सेंट जॉन दि बापटीस चर्च, ठाणे