डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील भाजप नगरसेविकेशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली भाजपचे पदाधिकारी संजय चौधरी यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविकेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.चौधरी हे भाजपचे ओबीसी सेलचे डोंबिवली शहर पूर्वचे अध्यक्ष तसेच पक्षाचे पूर्व विभागाचे उपाध्यक्षही आहेत. २९ सप्टेंबर रोजी ठाकुर्ली पूर्वेतील दत्ता पाटील चाळीजवळील हलाल चिकन सेंटरसमोर पाणीगळतीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू होते. काम व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्यासाठी त्या कामाच्या ठिकाणी संबंधित नगरसेविका या पती आणि मुलासोबत उभ्या असताना चौधरी हे अंगाला अंग घासून तेथून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २ आॅक्टोबरला ठाकुर्लीतील गावदेवी मंदिराजवळ पाणीगळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथे पुन्हा चौधरी आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता नगरसेविका आणि त्यांच्यात वाद झाला, यात चौधरी यांनी पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याचे रामनगर पोलीस ठाण्यात नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, स्वत:च्याच पक्षातील नगरसेविकाचा विनयभंग केल्याचा आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाजपच्या पदाधिकाºयावर गुन्हा दाखल झाल्याने पक्षामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रतिमा मलीन करण्याचा प्रकारस्थानिक लोकप्रतिनिधीकडून कोणतीही कामे होत नसल्याने नागरिक सातत्याने नागरी समस्यांबाबत माझ्याशी संपर्क साधत आहेत. जनतेचा कौल माझ्याकडे वाढत असल्याने खोटे आरोप करून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार आहे. केडीएमसीची निवडणूक समोर ठेवून माझ्याविरोधात हे षड्यंत्र रचले गेले आहे. केवळ वाद झाला, त्याची मी तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.- संजय चौधरी, भाजप डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष
भाजप नगरसेविकेशी पदाधिकाऱ्याचे गैरवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:36 AM