ठाणे : भव्यदिव्य नेपथ्य, ३१ मॉडेल्सचा सहभाग आणि सामाजिक संदेश देत शुक्रवारी, १५ जानेवारीला ‘मिस टिआरा इंडिया २०१६ इव्हॉॅल्युएशन आॅफ ब्युटी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. सौंदर्याच्या पलिकडे जाऊन मॉडेल्सच्या कलागुणांवा वाव देणारा हा कार्यक्रम आहे. नारीशक्तीचा संदेश देणा-या संकल्पनेवर आधारित नेपथ्य हे जसे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे, तसेच या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाच्या विजेतीला अमेरिकेत मिस एशिया इंटरनॅशनलसाठी पाठविण्यात येणार आहे. मेमरी मेकर्स इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी आणि रेखा मिरजकर फिल्म प्रॉडक्शनतर्फे मिस टिआरा इंडिया हा कार्यक्रम डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. भारतातील असा पहिलाच कार्यक्रम असल्याचे कंपनीचे क्रिएटिव्ह हेड हृषिकेश मिरजकर यांनी सांगितले. या स्पर्धेत देशभरातून ६९० मुली सहभागी झाल्या होत्या. दोन गटांमध्ये झालेल्या निवड फेरींतून ५०० मुलींची निवड करण्यात आली आणि त्यातून ५० मुलींना निवडण्यात आले. त्यांना सहभागाचे प्रमाणपत्र आणि आॅफर लेटर देण्यात आले. चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दादासाहेब फाळके यांना श्रद्धांजली म्हणून त्याच विषयावर या मुलींची प्रेझेंटेशन फेरी घेण्यात आली. त्यातून अंतिम फेरीसाठी सर्वोच्च ३१ मुलींची निवड करण्यात आली. त्यांचे चार दिवसांचे प्रशिक्षण पनवेल येथे झाले. यात त्यांना योगासने, पॉवर योगा, जुंबा शिकवण्यात आले, तर मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणासाठी मेरी कोमचे प्रशिक्षक रणबीर सिंग व कमल गुरू यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर रॉक क्लायम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, बंजी जम्पिंग, रिव्हर ड्राफ्टिंग, कत्थक नृत्याचे प्रशिक्षण देऊन आतापर्यंतच्या निवडक मिस इंडिया, मिस युनिव्हर्सच्या कारकिर्दीचा प्रवास दाखविण्यात आला. त्यानंतरच्या ‘इव्हिनिंग वेअर’ या फेरीत मॉडेलला स्वत:ची तयारी स्वत:लाच करण्यास सांगण्यात आले. मेकअपची बाजू ज्यूस सलॉनच्या ठाणे आणि मुलुंड शाखेने सांभाळली. या फेरीसाठी परीक्षक म्हणून बॉलीवूडमधील कांिस्ंटग डिरेक्टर निशित सालियान, फॅशन स्टायलिस्ट जान्हवी शहा, इंटरनॅशनल डिझायनर अनिस डीन व ज्यूस सलॉनच्या मालक डेव्ही स्कॉट आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाची सांगता बॉलीवूड नाईटने झाली. यात मॉडेल्सचा स्वीम वेअर राऊण्ड देखील पार पडला. या फेरीत मेकअपची बाजू कलर मी क्रेझी यांनी सांभाळली. कत्थक नृत्यातील नामवंत अलंकार मयूर वैद्य यांच्या नटराज बॅले नृत्याने १५ जानेवारीच्या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर इंडियन एथनिक आणि इव्हनिंग वेअर फेरी पार पडेल. कोलकत्त्याचे डिझायनर सुमीत दास गुप्ता व अनिस डीन यांचे वॉक होणार आहे. दरम्यान, या ३१ मॉडेल्समधून निवडण्यात आलेल्या १६ जणींना सबटायटल्स प्रदान करण्यात येतील. त्यानंतर लगेचच निवड फेरी होईल आणि या ३१ मुलींपैकी १२ मुलींची त्यासाठी निवड केली जाईल. प्रमुख पाहुणे म्हणून मिस वर्ल्ड २००७ किताब विजेती पार्वती ओमणा कुट्टम, मिस इंडिया एशिया पॅसिफिक २०१२ किताब विजेती हेमांगिनीसिंग याडू, मिसेस ग्लो इंटरनॅशनल २०१५ किताब विजेती इलाक्षी मोरे, बिग बॉस फेम संग्राम सिंग, नच बलिये फेम पायल रोहटगी, अभिनेते अशोक समर, बॉलीवूडमधील दिग्दर्शक राज सैगल, सुमीतदास गुप्ता, अनिस डीन, जान्हवी शहा, डेव्ही स्कॉट आदी मान्यवर उपस्थित राहतील. अंतिम फेरीत पहिले पाच क्रमांक काढले जाणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेतीला मिस टिआरा इंडिया ग्लोबल, दुस-या क्रमांकाच्या विजेतीला मिस टिआरा इंडिया इंटरनॅशनल, तिस-या क्रमांकाच्या विजेतीला मिस टिआरा इंडिया कॉण्टीनण्ट किताबाने गौरविण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकाच्या विजेतीला थर्ड रनर अप व पाचव्या क्रमांकाच्या विजेतीला फोर्थ रनर अप पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, असा तपशील हृषिकेश यांनी पुरविला.
ठाण्यात रंगणार भव्य स्पर्धा मिस टीआरा इंडिया ब्युटीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2016 2:04 AM