डोंबिवली: रेल्वे अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब लागत असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवलीतील श्री सदगुरूकृपा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मदतीपासून वंंचित असलेल्या पीडित कुटुंबांनी आमच्या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, आम्ही त्यांना फोन करू आणि एक रूपयाही मोबदला न घेता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करू, असे आवाहन संस्थेने केले आहे.रेल्वेचा अपघात झाल्यानंतर अपघाताचे ठिकाण, अपघातग्रस्तांचा पत्ता याबाबत अनेकदा पोलिसांकडून योग्य प्रकारे माहितीची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे अपघातग्रस्त तसेच मृतांच्या नातेवाईकांना योग्यप्रकारे आर्थिक मदत पोहोचविण्यात किंवा ती मिळण्यात अडचणी येत असल्याकडे संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी लक्ष वेधले. अनेकदा रेल्वे प्रशासनाकडूनही पीडितांना मदत मिळण्यास विलंब लागतो. या काळात अपघातग्रस्त व्यक्तीची तसेच कुटुंबाची पूर्णत: वाताहत होत असल्याने आमची संस्था पुढाकार घेऊन लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. रेल्वे अपघाताबरोबरच रस्ता अपघातातील पीडितांनीही संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत म्हात्रे यांनी केले.पीडितांची ही बाजू उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. वेळप्रसंगी आमची सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे अपघातग्रस्तांना मिस्ड कॉलचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:37 AM