कुजबुज: संधी हुकली आता अजित पवारांसोबत गेलेले आनंद परांजपे कुठली बस पकडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:21 AM2024-07-05T10:21:24+5:302024-07-05T10:21:51+5:30

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बार, पबवरील कारवाईनंतर ठाण्यात लागलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या पोस्टरवर परांजपे यांनी तोंडसुख घेतले

Missed opportunity, now what is Stand of Anand Paranjpe who went with Ajit Pawar | कुजबुज: संधी हुकली आता अजित पवारांसोबत गेलेले आनंद परांजपे कुठली बस पकडणार?

कुजबुज: संधी हुकली आता अजित पवारांसोबत गेलेले आनंद परांजपे कुठली बस पकडणार?

एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर सावलीसारखे फिरणारे आनंद परांजपे अजित पवारांसोबत गेले. आव्हाडांची ढाल अशी भूमिका वठवणारे परांजपे गट बदलताच आरोपांची तलवार सपासप चालवू लागले. ठाणे लोकसभा मतदारसंघ किंवा राज्यसभा यांचे आमिष त्यांना दाखवल्याची कुजबुज होती. ठाण्यात संजीव नाईक यांचीच डाळ न शिजल्याने परांजपे यांनी आपली डाळ चुलीवर ठेवली नाही. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला. राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांपासून अनेक इच्छुक होते. शेवटचे इच्छुक म्हणून परांजपे यांचे नाव होते. सुनेत्रा पवार या दिल्लीत गेल्याने परांजपे यांची ही संधी हुकली. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बार, पबवरील कारवाईनंतर ठाण्यात लागलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या पोस्टरवर परांजपे यांनी तोंडसुख घेतले. त्यामुळे आता परांजपे कुठल्या बसमधून उतरून कुठली बस पकडतात, याची चर्चा सुरू आहे.

दादा, गुस्सा क्यों आया?

ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे समस्त नवी मुंबईकरांत ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. एरवी शांत स्वभावाचे दादा बुधवारी विधीमंडळात फारच आक्रमक झाले. सिडकोसह नगरविकास खात्यातील अधिकारी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या अब्रूची लक्तरे त्यांनी  वेशीवर टांगली. निमित्त होते सिडको आणि नगरविकास खात्यातून नवी मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे. केवळ सिडकोच नव्हेतर, एमआयडीसीनेही शहरातील सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड विकण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंना सिडको अधिकारी जुमानत नसल्याचा संताप दादांनी व्यक्त  केला. इतकेच नव्हेतर, सिडको आणि  सरकारमध्ये बिल्डरांचे काही दलाल बसल्याचा घणाघात त्यांनी केला. नगर विकासाची दोरी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेल्यापासून सारेच निर्णय ठाण्याहून होऊ लागले. याबाबतच त्यांच्या भाषणात प्रतिबिंब उमटले.

(कुजबुजसाठी संदीप प्रधान, नारायण जाधव यांनी लेखन केले आहे)

 

Web Title: Missed opportunity, now what is Stand of Anand Paranjpe who went with Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.