ठाणे : लॉकडाऊनमुळे व्यवसायात चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेले ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे) हे चिपळूण येथे असल्याचे उघड झाले आहे. नौपाडा पोलिसांनी वैद्य यांना रविवारी सुखरूप घरी आणल्यामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
ठाण्यातील सेंट जॉन हायस्कूलच्या बाजूला चरई येथे ज्ञानेश याचे अवधूत फॅब्रिकेटर्स हा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याला मित्र परिवाराकडून कर्ज घ्यावे लागले होते. आता काहींनी त्याच्याकडे कर्ज परत फेडीसाठी तगादा लावल्यामुळे तो कोणालाही काहीही न सांगता ७ जुलै २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याची वाट पाहून ८ जुलै रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर. एन. आरोंदेकर आणि पोलीस नाईक किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा चिपळूण येथे शोध घेतला. त्याला नातेवाइकांच्या मदतीने ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील एसटी बस थांब्यासमोरून ताब्यात घेतले. कर्जबाजारी झाल्याने आपण घर सोडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
...........