मीरारोड - भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातून बेपत्ता झालेले ८१ वर्षीय रुग्ण हे सोमवारच्या मध्यरात्री भाईंदर पूर्व भागात सापडले. मीरारोडच्या सृष्टी भागात राहणाऱ्या काकुली मित्रा यांनी त्यांचे वडील बद्रीनाथ नाग (८१) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. नाग यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते.
सोमवारी दुपारी १२ वाजता काकुली पुन्हा रुग्णालयात गेल्या असता त्यांचे वडील हे रुग्णालयातून बेपत्ता झाले होते. गेली रुग्णालयात जाऊन पाहिले तर तिचे वडील बद्रीनाथ हे दिसले नाहीत. रुग्णालयातील रुग्णांच्या देखभाल व सुरक्षेची जबाबदारी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची असताना देखील त्यांचा कमालीचा हलगर्जीपणा या मुळे उघडकीस आला. बद्रीनाथ यांना सकाळी सध्या वॉर्ड मध्ये आणण्यात आले होते. सव्वा बाराच्या दरम्यान बद्रीनाथ हे रुग्णालयातून निघून गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसले. वास्तविक आयसीयू मधून रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये हलवताना त्याचे नातेवाईकांच्या उपस्थितीत हलवले पाहिजे होते मात्र ते देखील पाळले गेले नाही.
काकुली यांना रुग्णालयातून दाद मिळत नसताना मनसेचे शिष्टमंडळ त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घडला प्रकार सांगितल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत सह १४६ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पोपळे, उपाध्यक्ष वैशाली येरुणकर, अभिनंदन चव्हाण, रॉबर्ट डिसोझा, चंद्रशेखर जाधव, श्रेयस सावंत, गणेश बामणे आदींनी रुग्णालय प्रशासनास जाब विचारल्यावर पोलिसांना कळवण्यात आले तसेच सीसीटीव्ही पडताळणी करून नाग यांचा शोध सुरु झाला. बद्रीनाथ नाग हे वृद्ध आणि आजारी असल्याने ते बेपत्ता झाल्या बद्दल चिंता व्यक्त होत होती.
नाग यांचे छायाचित्र शहरातील सर्व पोलीस ठाण्यासह व्हॉट्स एप ग्रुप आदी ठिकाणी शेअर करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील कस्तुरी पार्क भागात नाग हे दिसून आले. नागरिकांनी नवघर पोलिसांना कळवल्या नंतर पोलिसांनी त्यांना आणून भाईंदर पोलिसांना कळवले. पोलिसांनी मुलगी काकुली यांना बोलावून घेत पहाटे अडीचच्या सुमारास नाग यांना त्यांच्या स्वाधीन केले. मनसेचे सावंत, पोपळे यांनी या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करा. तसेच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था काटेकोर करावी, सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी अशी मागणी केली आहे.