जितेंद्र कालेकर -ठाणे- ठाण्यातील तीन हात नाका येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलीचा अवघ्या २४ तासांमध्ये शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. रागाच्या भरात एका परिचितानेच या मुलीला आई वडिलांच्या ताब्यातून नेल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली.
तीन हात नाका येथील उड्डाणपूलाच्या खाली राहणाऱ्या एका दाम्पत्याची ही चिमुरडी ६ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. या दाम्पत्याने तिचा परिसरात बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद निकम यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा नवी मुंबईतील वाशी, बेलापूर आणि मुंबईतील मानखुर्द भागात त्यांचे नातेवाईक आणि परिचित वास्तव्याला असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, बेलापूर येथे ही मुलगी असल्याची माहिती समजल्यानंतर याठिकाणी शोध पथकाने तिचा शोध घेतला. तेंव्हा रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ती नवी मुंबई बेलापूर येथील पनवेल- मुंबई रोडवरील ब्रिज खाली मिळाली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर ७ आॅगस्ट रोजी (रविवारी) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास तिची आई आशा पवार हिच्या ताब्यात तिला सुखरुप देण्यात आले. आपली मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर पवार दाम्पत्याने नौपाडा पोलिसांचे आभार मानले आहे.