ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष, महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस ही मोहीम राबविणार आहे. तिन्ही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास संपूर्ण पाठिंबा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकतेर् मोठया प्रमाणात उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. योग्यवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण स्वत:, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी आपण स्वत: तर दिवाळीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात, न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर आरक्षण मिळायलाच हवे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तसेच अल्पसंख्याक समाजालाही ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण टीकले नाही, नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्याचेही आम्ही समर्थन करतो, असेही तटकरे यांनी सांगितले.