वसई : वसई-विरार पालिकेच्या आरोग्यविभागाकडून साफसफाई आणि औषध फवारणीसाठी दरवर्षी ९६ कोटींचा खर्च होत असतानाही शहरात डासांचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी जन आंदोलन समितीने पालिकेवर मोर्चा नेला होता. या आंदोलनातर्गंत पंधरा दिवसांपूर्वी ‘आय’ प्रभाग समितीच्या कार्यालयाला धडक देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी प्रभाग समिती ‘अ’ च्या कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांच्याशी यावेळी मिलींद खानोेलकर, विन्सेंट परेरा, सुनील डिसिल्वा, प्रफुल्ल ठाकूर, रिक्सन तुस्कानो, बावतीस फिगेर, मार्शन रॉड्रीक्स, फेलोमीना रॉड्रीक्स, फेलोमीना तुस्कानो यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून उपाय योजना करण्याची मागणी केली. तसेच त्यांना डासांचे निर्मूलन करण्याची आठवण करून देण्यासाठी डांस मारणाऱ्या रॅकेटही यावेळी ग्रामस्थांकडून दरवेशी यांना भेट देण्यात आले.सकाळी औषध फवारणी करताना आरोग्य निरिक्षकांनी स्वत: पाहणी करून औषधांची तपासणी करावी. उघड्या गटारांवर झाकणे बसवावीत. डे्रनेजच्या टाक्या स्वच्छ केल्यानंतर त्यातील मलमूत्र शहराबाहेर विसर्जीत करावे. त्यावर प्रक्रिया करण्यात यावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर या मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दरवेशी यांनी दिले. (प्रतिनिधी)
वसईतील ‘मिशन मच्छर’ फेल
By admin | Published: March 04, 2016 1:23 AM