कल्याण - राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून परदेशात माझ्या पाणीनियोजनाची दखल घेत आहेत. याउलट, आपल्या देशात स्थिती असल्याची खंत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे कल्याणमध्ये आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये खान्देशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, मुले सहभागी झाली होती.रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवात हिवरे बाजारचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांचा ‘खान्देशभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, ए.जी. पाटील, अनिल बोरनारे, आर.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आज शहराकडे वळले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील लोकवस्तीला धरणातील अर्धे पाणी खर्च होत आहे. पाण्याचे जतन करून ते जपून वापरले पाहिजे. त्यासाठी नियोजन सांगण्यासाठी मी अनेक परदेश दौरे केले. तेथील नागरिक त्याचे अनुकरण करतात; मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनता आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. सचिन तेंडुलकर, आमीर खान यांनीही पाणीबचतीसाठी काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. हे सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत; मात्र शहरी भागाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात बोअरवेल १५०० फुटांच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. शहरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी ग्रामीण भागाकडे वळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पवार म्हणाले की, आमच्या हिवरे गावास दरवर्षी ७०० ते ८०० लोक भेट देतात. परदेशी लोकही येतात. मसुरीला एक संस्था आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. त्याठिकाणी मी १५ वर्षांपासून अतिथी व्याख्याता म्हणून जात आहे. त्यामुळे आयएएस अधिकारीही पाणीनियोजनाबाबत जनजागृती करत आहेत. माझेही पाणीनियोजनाबाबत १० ते १२ परिसंवाद होतात. महाराष्ट्रातील पाणीटंचाई पाहता नियोजनाची सर्वाधिक गरज आहे.महोत्सवामुळे दलालदूर राहतात!खान्देशी महोत्सवामुळे खाद्यशेती उद्योगाला चालना मिळते. महोत्सवामुळे दलाल दूर राहत असल्याने शेतकºयांना अधिक नफा मिळवता येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच शेतकºयांनी जोडधंदे सुरू करण्याची गरज असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकºयांच्या आत्महत्यांना आळा बसेल. इस्राएल आणि मॉरिशस या देशांतील शेती तंत्रज्ञान विकसित आहे. आपल्याकडेही ते विकसित केले पाहिजे, असे पवारम्हणाले.
राज्यात धरणांच्या उद्देशालाच फासला हरताळ, पोपटराव पवार यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 3:47 AM