उल्हासनगर : कठिण प्रसंगी देश उभा करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूवर टीका करणारे सत्तेचा गैरवापर करून मूलभूत अधिकारावर गदा आणत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. ते संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत बोलत होते. नेते जितेंद्र आव्हाड, महेश तपासे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात संविधान हक्क समितीने एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देशात व राज्यात भयावह परिस्थिती असून राज्याने उत्तरप्रदेश व बिहारला मागे टाकले आहे. देशात कुठेच पोलीस ठाण्यात आमदाराने गोळीबार केला नसेल असे प्रकार शहरात घडत आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये यासाठी शिक्षणाचे केंद्रीयकरण करीत असल्याचा आरोप केला. ज्या नागरिकांना मतदानाचा हक्क दिला, त्यांनी त्याचा वापर केला नाहीतर, देश हुकूमशाहीकडे जात असल्याची खंत व्यक्त केली. यापुढे साहेबांच्या विरोधात बोलले त्याला सोडणार नसल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या सभेला आवर्जून आल्याचे सांगितले. सभेला गर्दी महत्वाची नसून या सभेचा उद्देश जनमानसात जाणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी देश उभा करण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या मंत्रीमंडळातील डॉ बाबासाहेब आंबेडकरसह अन्य जणांनी जीवाचे रान केले. मात्र ज्यांनी देश उभा केला. त्यांच्यावरच टीकाटिप्पणी होत आहे. शेजारील देशात जी परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती देशात निर्माण होण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमा वेळी निखिल वागळेसह अन्य जणांवर हल्ला झाला असून असेप्रकार राज्यात होत आहेत. संविधान व अधिकारावर गदा येत असल्याने, सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सभेला महेश तपासे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे, राजेश वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, अण्णा रोकडे, सदा पाटील यांच्यासह अनिल अहिरे, निशा भगत आदीजन उपस्थित होते.
सभेला कलानी कुटुंब गैरहजर शरद पवार यांनी सभेपुर्वी कलानी महल मध्ये जाऊन पप्पु कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांची भेट केली. मात्र सभेला कलानी कुटुंबासह बहुतांश समर्थक गैरहजर राहिले.