कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची धाव घेतली होती. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान हे प्रकरण मागे घेण्यासाठी शनिवारी अज्ञात व्यक्तीने जगताप यांना एक निनावी पत्र पाठवले आहे. त्या पत्रात पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच, कुटुंबीयांनाही पोलिसी जाच सुरू झाल्याने ते टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीला राहायला गेले. न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र रविवारी पुष्पा जगताप या टिटवाळा मधील जुन्या घरी गेले असता त्यांना पाकिटातील धमकीचे निनावी पत्र मिळाले. या पत्रात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लगेच मागे घ्या. पोलिस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या, गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसात विरोधात कोर्टात जाऊन माघार घ्यायची आहे. त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हाती आहेत. काळजी घ्या अशा आशयाचे धमकी वजा निनावी पत्र अज्ञात व्यक्तीने लिहिले आहे.
या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या अज्ञात व्यक्ती विरोधात मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी टिटवाळा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोघे दोषी पोलिसाचा न्यायालयात समोर अहवाल सादर केला जाणार असल्याने ते अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते. ही केस कोर्टासमोर सादर होऊ नये म्हणून केस मागे घेण्यासाठी निनावीपत्राद्वारे धमकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने याबद्दल बोलणे उचित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.