उल्हासनगर- उल्हासनगर व कल्याण शहराला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा छोटे सीएम असा उल्लेख केला. खासदार शिंदे यांनी मात्र मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचे सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथे कल्याण व उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या वालधुनी नदीवर साडे पाच कोटीच्या निधीतून पर्यायी नवीन पूल बांधण्यात आला. वाहनांना वालधुनी नदीवरील नवीन पूल खुला करण्याची मागणी झाल्यावर, रविवारी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन होऊन पूल खुला करण्यात आला. उदघाटन वेळी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील धोकादायक इमारती पुनर्बांधणी विधेयकाला नागपूर अधिवेशनात मंजुरी दिल्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. तसेच पर्यायी पुलाचे उदघाटन झाल्याने, वाहतूक कोंडी निकाली निघाले असून शहरातील डांबरीकरण रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी खासदार शिंदे यांच्याकडे आयलानी यांनी केली. मोठे सीएम एकनाथ शिंदे तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे असा उल्लेख आयलानी केल्यावर, सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.