मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या कन्या स्नेहा सकलेजा यांना सासूबाईंनी मागवलेल्या मिठाईचे ऑनलाईन पैसे देण्यात सायबर लुटारूंनी ८० हजार रुपयांना गंडवले आहे . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर इतके पैसे भरून देखील आमदार कन्येच्या सासूबाईंना मिठाई काही मिळाली नाही .
सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच पोलिसां कडून सुद्धा सातत्याने जनजागृती व काय काळजी घ्यावी याचे आवाहन केले जाते . तरी देखील अनोळखी लोकांच्या सांगण्यानुसार व्यवहाराच्या संदर्भात प्रक्रिया करून स्वतःची फसवणूक करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे .विशेष म्हणजे त्यात शिक्षित आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे . सायबर लुटारूंच्या फसवणुकीला आमदार गीता जैन यांच्या सुशिक्षित व व्यवसायीक असलेल्या कन्या स्नेहा ह्या बळी पडल्या आहेत .
स्नेहा ह्यां त्यांच्या सासू प्रतिभा सकलेजा यांनी कॉल करून सांगितले कि , तिवारी ब्रदर्स कडून ऑनलाईन ऑर्डरने मिठाई मागवली असून त्याचे ऑनलाईन ४८० रुपये क्यूआर कोड द्वारे द्यायचे आहेत . स्नेहा यांनी क्यूआर कोड पाठवण्यास सांगितले असता सासू यांनी तो पाठवला . त्या क्यूआर कोड वर स्नेहा यांनी जीपे द्वारे ४८० रुपये भरले .
मात्र त्यांच्या सासू यांना स्वतःला तिवारी ब्रदर्स मधून बोलतो सांगणाऱ्याचे कॉल येत असल्याने त्यांनी स्नेहा यांचा नंबर दिला . स्नेहा यांना व्हॉट्सअप वर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला आणि आपण तिवारी ब्रदर्स मधून बोलत तुम्ही जे ४८० रुपये भरले त्याचे जीएसटी साठी नोट हवे आहे असे सांगितले . त्या नंतर त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले त्या प्रमाणे स्नेहा यांनी आकडे नमूद केले व टाईप केले असता सुरवातीला ३९ हजार ५०६ रुपये त्यांच्या खात्यातून गेले .
स्नेहा यांनी त्या बाबत विचारणा केली असता समोरच्या व्यक्तीने माफी मागून तुमचे पैसे परत खात्यात जमा होतील , मी सांगतो तसे टाईप करा म्हटले . स्नेहा यांनी पुन्हा त्याप्रमाणे केले असता त्यांच्या खात्यातून आणखी ३९ हजार ५०६ रुपये कमी झाले . स्नेहा यांनी अनोळखी व्यक्तीला कॉल केला असता त्याने कट करून नंतर नंबर ब्लॉक केला . या घटने प्रकरणी स्नेहा यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केदारे तपास करत आहेत . वास्तविक सायबर लुटारू हे कोडचे आकडे सांगून प्रत्यक्षात रक्कम भरून घेत असतात .