सदानंद नाईक/ उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यात झालेल्या आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी भिवंडी क्राईम ब्रँचने आमदार गायकवाड यांचा खाजगी चालक रणजित यादव याला अटक केली. उल्हासनगर न्यायालयाने यादव याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड, वैभव गायकवाड, हर्षल केणी, संदीप सरवनकर, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले.
सुरवातीला पोलिसांनी गोळीबार ठिकाणाहून आमदार गणपत गायकवाड, संदीप सरवनकर व हर्षल केणी या तिघाना अटक केली असून त्यांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली. त्यानंतर विकी गणोत्रा तर शनिवारी भिवंडी क्राईम ब्रँचने आमदार गायकवाड यांचे खाजगी चालक रणजित यादव यांना पोलिसांनी अटक केली असून उल्हासनगर न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली.
आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्याप फरार असून दोघेही पोलिसांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. एक -दोन दिवसात ते क्राईमला हजर होणार असल्याचे बोलले जाते. याबाबत विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांना संपर्क केला असता झाला नाही. हिललाईन पोलीस ठाण्यात सुरवातीला ६ जनासह इतरा विरोधात गुन्हा दाखल केला. रणजित यादव याला पोलीस पथकाने तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अटक करण्यात आली असून अनेक जण पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जाते. १४ फेब्रुवारीनंतर गोळीबार प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची यादी बनविल्यावर असंख्य जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
आमदार गायकवाड कुटुंबाची चुपकी कायम हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर ४ जणांना अटक केली. तर आमदार पुत्र वैभव गायकवाड, नागेश बेडेकर फरार असून गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी एकदाही गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया दिली नाही. आमदार गायकवाड यांच्या १४ फेब्रुवार पर्यन्तच्या पोलीस कस्टडी पर्यंत कुटुंबांनी काहीएक पत्रकारां सोबत बोलू नये. असे सक्त आदेश पक्षाकडून मिळल्याचे बोलले जात आहे.