उल्हासनगर : गेल्या ७ महिन्यापासून बंद पडलेली टोईंग गाडी पुन्हा सुरू होताच व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आमदार आयलानी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधिकारी व आयलानी यांच्यात तू तू मैं मैं झाली. अखेर व्यापाऱ्यांच्या विरोधा पुढें वाहतूक पोलीस विभागाने झुकते घेऊन टोईंग गाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उल्हासनगरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. नेहरू चौक मार्केट परिसरात दुकांनासमोर कसेही वाहने पार्किंग केली जात असल्याने, वाहतूक कोंडीत भर पडली आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रमेश पोवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी गेल्या ७ महिन्यापासून व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडलेली टोईंग गाडी पुन्हा सुरू केली.
टोईंग गाडीला सहकार्य करण्या ऐवजी व्यापाऱ्यांनी आमदार कुमार आयलानी यांची भेट घेऊन टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली. आमदार आयलानी यांनी आमदार संपर्क कार्यालयात वाहतूक पोलीस विभागाचे सहायक आयुक्त रमेश पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्यासह व्यापारी संघटनेची बैठक रविवारी दुपारी बोलाविली. बैठकीत व्यापाऱ्यांनी टोईंग गाडी बंद करण्याची मागणी केली. त्यावेळी सहायक पोलिस आयुक्त रमेश पोवार यांनी टोईंग गाडी बंद करता येत नाही. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. असे सांगितले.
आमदार आयलानी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत टोईंग गाडी बंद ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी आमदार कुमार आयलानी व सहायक पोलिस आयुक्त रमेश पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्यात तू तू मैं मैं झाली. अखेर वाहतूक पोलीस विभागाने झुकते घेत टोईंग गाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र शहराला वाहतूक कोंडीतून सोडण्यासाठी टोईंग गाडीची गरज असल्याचे मत सहायक पोलिस आयुक्त पोवार यांनी व्यक्त केले. तसेच मार्केट परिसरात दुकांनासमोर कसेही वाहने पार्किंग करण्यावर हरकत घेतल्याचेही पोवार म्हणाले.
दरम्यान, शहर वाहतूक पोलीस विभागाच्या टोइंग गाडीमुळे अनेकदा व्यापारी व पोलीस असा वाद निर्माण झाला. वाहतूक कोंडी सोडण्याऐवजी वाहतूक पोलीस वसुलीत दंग आहे. असा आरोप आयलानी यांनी केला आहे.