ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. अशातच आता नियम डावलून महापौर नरेश म्हस्के यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. परंतु आपण नियमानुसारच लस घेतल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. याउलट लस मिळावी म्हणून डुंबरे यांनी माझ्याकडे पत्रव्यवहार केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड हॉस्पिटलमध्ये २० फेब्रुवारी रोजी म्हस्के, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी लस घेऊन फोटोसेशन केले होते. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी युद्ध करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींचा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश केलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे असतानाही म्हस्के व फाटक यांनी बेकायदेशीरपणे कोरोना लस घेतल्याचा आरोप डुंबरे यांनी केला.
लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य व पोलिसांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही समावेश करावा, अशी मागणी म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २ डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. परंतु आपल्या पदाचा गैरवापर करीत म्हस्के व फाटक यांनी रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकून लस घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
महापौर कार्यालयातून माझ्याकडे लस घेण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत मागण्यात आली. भविष्यातील लसीकरणासाठी यादी तयार केली जात असल्याचे मला वाटले होते. त्यानंतर लगेच मला लस घेण्याची सूचना करण्यात आली. यासंदर्भात सरकारी यंत्रणांकडे चौकशी केल्यावर केवळ फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आपण लस घेतली नसल्याचेही डुंबरे यांनी स्पष्ट केले.