ठाणे येथील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या विकासकामांमध्ये पोखरण रोड नं.२ येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर व महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण, पोखरण रोड नं.२ येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेकडील सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह व शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.
विविध कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझी १३ वर्षांची आमदारकी फुकट गेली, कारण निधी मिळत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांनाही निधी दिला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आधी का नाही हे केलं? असा प्रश्न मला पडला आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच मी एकनाथ शिंदे यांना नायक चित्रपटाची प्रतिमा भेट दिली. यामध्ये एका बाजूला अनिल कपूर आणि एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याचं प्रताप सरनाईकांनी यावेळी सांगितले. ही भेट पाहताच एकनाथ शिंदेंनाही हसू आले.
दरम्यान, मुंबई आणि ठाणे शहर आता बदलत असून ठाणे शहरातील क्लस्टर योजना आता प्रत्यक्षात येणार आहे. शहरातील रस्त्यांची कामे देखील प्रगतीपथावर असून त्यामुळे येत्या काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला आपल्याला दिसेल. त्यासोबतच मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होत असून खड्ड्यांमधून लोकांना कायमचा दिलासा मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने तयार होत असलेल्या या विकासकामांमुळे शहरातील नागरिकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.