नितीन पंडित, भिवंडी: मराठा समाजाला शिक्षण नोकरी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासंदर्भात राज्य विधिमंडळाचे विशेष एक दिवसीय अधिवेशन मुंबई येथे होत असताना या अधिवेशनात जाताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीचा फलक फडकवित समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आजमी व रईस शेख यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकास समाजवादी पक्षाचा पाठिंबा असेल.परंतु इतर जातसमूहांवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करु अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.या संदर्भात रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र सुध्दा दिले असून मराठा समाज ज्याप्रमाणे आर्थिक व शिक्षणात मागासलेला आहे त्या प्रमाणे मुस्लीम समाजसुद्धा आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात अद्याप ही मोठ्या प्रमाणावर मागासलेला असून त्या समाजाला सुध्दा आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
राज्यात ११.५ टक्के मुस्लीम समाज आहे.न्या.सच्चर आयोग,न्या. रंगनाथ मिश्रा समिती यांनी मुस्लीम समाजाचे आर्थिक, शैक्षणिक मागसलेपण आकडेवारींसह सिद्ध केलेले आहे.तर २००९ मध्ये स्थापन झालेल्या डॉ. मेहमुदुर्रहमान समितीने मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकऱ्यात आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती.मराठा बांधवांना आरक्षण दिले जात असतानाच मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचे काय असा सवाल राज्यातला मुस्लीम समाज उपस्थित करीत आहे असे आमदार रईस शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आपण आज विधान भवना बाहेर आंदोलन केले असून भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.