लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी संयुक्त घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आराखडा आज एमएमआरडीकडे सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी अंदाजे १४५ कोटींची गरज असल्याने त्यातील ५० टक्के भार एमएमआरडीएने उचलावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यांच्या या मागणीला एमएमआरडीएच्या आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली.
अंबरनाथ शहरातील कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो कचरा डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात येत होता. त्यामुळे पालिकेला कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करणारा स्वतंत्र अहवाल तयार केला होता, मात्र या प्रकल्पासाठी खर्च अफाट असल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केवळ अंबरनाथपुरता प्रकल्प न राबविता अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी एकत्रित घनकचरा प्रकल्प राबविण्याची सूचना केली होती. स्पेन मधील एका कंपनीच्या तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया असा एकत्रित प्रकल्प असल्याने या प्रकल्पासाठी बदलापूर येथील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमधील आठ एकर जागा निश्चित करण्यात आली. प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सुटला असला तरी या प्रकल्पासाठी १४५ कोटींची गरज असल्याने एकट्या अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेला एवढा भार सहन करणे शक्य नव्हते. या दोन्ही पालिकांची आर्थिक कोंडी रोखण्याच्या अनुषंगाने या घनकचरा प्रकल्पाला ५० टक्के अनुदान एमएमआरडीएकडून मिळावे, अशी मागणी खा. शिंदे यांनी केली आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने आज एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या सोबत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाची माहिती आयुक्तांना देण्यात आली. हा प्रकल्प कसा व कोठे राबविण्यात येणार आहे, याची सर्व माहिती सादर करण्यात आली. या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून ७३ कोटी रुपये निधी स्वरूपात मिळावे, अशी अपेक्षा खा. शिंदे यांनी यावेळी केली. स्पेनच्या तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी देखील प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली.
-----------------
- अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सरासरी अडीचशे टन कचरा दररोज संकलित करण्यात येत आहे. पुढच्या दोन वर्षांत हाच कचरा ३०० टनच्या घरात जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या कचऱ्याची पूर्तता या दोन्ही शहरांतून होणार आहे.
- हा प्रकल्प १४४ कोटींचा असून, त्यातील ५० टक्के निधी एमएमआरडीएकडून मिळणे अपेक्षित आहे. उर्वरित निधीपैकी १८ कोटी अंबरनाथ नगरपालिका, ५ कोटी ५० लाख रुपये बदलापूर पालिका आणि ५० कोटी रुपये प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीचा हिस्सा असणार आहे.
- हा प्रकल्प कोरोनाच्या संकटामुळे दीड वर्षे पुढे सरकला असून, आता भविष्यात या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी एमएमआरडीएच्या निधीची नितांत गरज भासणार आहे. या प्रकल्पाचे भवितव्य एमएमआरडीएच्या निधीवर अवलंबून आहे.