- राजू काळे भार्इंदर: पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव मुख्य मार्गावरील वाहतूककोंडीचे नियोजन करण्याकरिता व जलद वाहतुकीसाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या तीन पुलांऐवजी (अंडरपास) केवळ दोनच पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. तसेच पालिकेने मीरा रोड येथे प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलाचा व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तपासून निर्णय घेणार असल्याचे पालिकेला कळवले आहे.शहरात व शहराबाहेर येजा करण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील फाटकापासून ते पश्चिम महामार्गापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव मुख्य मार्ग उपलब्ध आहे. या मार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड प्रस्तावित असतानाही ते तेथील अतिक्रमणांमुळे अद्याप मार्गी लागलेले नाहीत. यामुळे वाढत्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता अपुरा पडत आहे. परिणामी, येथे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यातच जागोजागी सिग्नल बसवण्यात आल्याने वाहनांची गती मंदावते.वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पालिकेने गोल्डन नेस्ट सर्कल ते दीपक हॉस्पिटल, शिवार गार्डन ते एस.के. स्टोन व प्लेझंट पार्क ते सिल्व्हर पार्कदरम्यान ३७७ कोटी ६६ लाख रुपये खर्चाचे तीन पूल प्रस्तावित केले होते. हे पूल उभारण्याकरिता एमएमआरडीएद्वारे कर्ज व बांधकामाची परवानगी मिळावी, याकरिता पालिकेने २०१६ मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. परंतु, एमएमआरडीएने पालिकेच्या मर्यादित उत्पन्नावर बोट ठेवून पालिकेला कर्ज देण्यास नकार दिला. हे पूल एमएमआरडीएने स्वखर्चातून बांधले, यासाठी आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अखेर, मुख्यमंत्र्यांनी २३ मार्च २०१६ रोजीच्या एमएमआरडीए बैठकीत तीन पूल एमएमआरडीएच्या खर्चातून बांधण्यास मान्यता दिली. परंतु, एमएमआरडीएने त्या तीन उड्डाणपुलांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूदच केली नाही.>अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णयएमएमआरडीएने हे पूल मेट्रो प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट केले. परंतु, तीन वाहतूक पुलांऐवजी केवळ शिवार गार्डन ते एस.के. स्टोन व गोल्डन नेस्ट सर्कल ते दीपक हॉस्पिटलदरम्यान केवळ दोनच पूल बांधणार असल्याचे पालिकेला कळवले आहे.शहराच्या पूर्व-पश्चिमेकडे येजा करण्यासाठी भार्इंदर येथे एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल व तीन मीटर उंचीपर्यंतच्या वाहनांसाठी उत्तरेला एकमेव भुयारी मार्ग उपलब्ध आहे. त्यांना पर्याय म्हणून मीरा रोड येथे पूर्व-पश्चिमेला जोडणारा पर्यायी उड्डाणपूल एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने सादर केला होता. मीरा रोडच्या पूर्व भागात दाट लोकवस्ती असून पश्चिमेला मात्र लोकवस्ती नाही. त्यामुळे प्रस्तावित उड्डाणपूल किती व्यवहार्य ठरणार, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे एमएमआरडीएने पालिकेला कळवले आहे.>तीन पुलांची आवश्यकता असताना एमएमआरडीएने दोनच पुलांना मंजुरी दिली आहे. त्याचे आराखडे पालिकेला लवकरच प्राप्त होणार असून त्यांची व्याप्ती पाहूनच आणखी एका पुलाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मीरा रोड पश्चिमेस अनेक गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच प्रस्तावित उड्डाणपूल झाल्यास उत्तन येथे कमी वेळेत पोहोचता येणार आहे. यामुळे इंधन व वेळेची बचत होणार असल्याने उड्डाणपुलाची निकड एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.- नरेंद्र मेहता, आमदार, भाजपा
दोनच पूल बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:20 AM