ठाणे: छटपूजा कृत्रिम तलावात करा अशी मनसेने केलेल्या मागणीवरुन सोशल मीडियावर मनसैनिकांना ‘चिल्लर’ संबोधणाऱ्या एका उत्तर भारतीय नागरिकाने पक्षाची आणि मनसैनिकांची जाहीर माफी मागितली आहे. छटपूजेप्रकरणी मनसैनिक आणि उत्तर भारतीयांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. गणेशोत्सव काळात ज्या प्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली जाते त्या धर्तीवर छटपूजेकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी चार दिवसांपुर्वी मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे महापालिकेकडे केली होती. याबाबत उत्तर भारतीय रजनीश सिंह याने सोशल मीडियावर ही बातमी पोस्ट करुन त्यावर मनसैनिक आणि पक्षाविरोधात अपशब्द वापरले होते. मनसैनिकांना चिल्लर असे संबोधून मनसैनिकांना गमछा स्टाईलचा सामना करावा लागेल आणि हे गुजरात नसून ठाणे, महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेवा अशी धमकी वजा आव्हान दिले होते. रविवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ही पोस्ट सिंह याने टाकल्यावर मनसैनिकांमध्ये संताप उसळला आणि सिंह याच्या पोस्टवर त्यांनी उलटप्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे आणि ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी त्याचा पत्ता शोधून काढला. वातावरण दूषित होऊ नये म्हणून आम्ही रितसर वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलीसांनी सिंह याला बोलवून समज दिली. पुन्हा असे माझ्याकडून होणार नाही अशी कबुली त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेला दिली असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. -------------------------------------*मनसे विद्यार्थी सेनेचा विरोध हा छटपुजेला आहे असा माझा गैरसमज झाला आणि मी कोणताही विचार न करता त्यांच्या विरोधात पोस्ट टाकली. दोन - तीन तासांनी मला त्यांचा मुद्दा हा स्वच्छतेला घेऊन असल्याचे समजले मी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली आणि सर्व मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची स्वत: संपर्क करुन, त्यांना मेसेज पाठवून माफी मागितली. मी चुकीचे लिहीले होते याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. माफी मागितल्यावर मनसे विद्यार्थी सेनेने मला समजून घेतले.- रजनिश सिंह*रजनिश सिंह याने घाबरुन ती पोस्ट डिलीट केली आणि सर्वांची माफी मागितली. आम्ही त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. जो पक्षा विरोधात किंवा राज ठाकरे यांच्या विरोधात बोलेल त्याचा असाच समाचार घेतला जाईल.- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हा अध्यक्ष, मनविसे*रजनिश सिंह याने मला स्वत: फोन केला होता. तसेच, रात्री दोन वाजता भेटून माफी मागितली आहे. आम्हीही त्याला समज दिली आहे.- किरण पाटील, शहर अध्यक्ष, मनविसे
छटपूजेप्रकरणी मनसैनिकांना `चिल्लर` संबोधणाऱ्या ठाण्यातील उत्तर भारतीयाने मागितली त्यांची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 4:51 PM
छटपुजेप्रकरणी ठाण्यातील उत्तर भारतीयाने मागितली मनसैनिकांची माफी मागितली आहे.
ठळक मुद्देउत्तर भारतीयाने मागितली मनसैनिकांची माफीपोस्ट डिलीट केली आणि सर्वांची माफी मागितली - संदीप पाचंगेमाझा गैरसमज झाला - रजनिश सिंह