मीरारोड - मीरारोडच्या राम नगर येथील प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरु असल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते कार्यालयात शिरले होते . त्या वरून अधिकाऱ्यांना शिवीगाळ - दमदाटी करत एका प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे .प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . त्या नुसार अधिकारी व कर्मचारी दारूची पार्टी करत होते आणि आम्हाला पाहून ग्लास व बाटली खाली फेकून दिल्याचा आरोप केला . तर प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे , निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे यांनी आम्ही अजिबात दारू घेतली नसून तसला काही प्रकार नाही . वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा असे मनसैनिकांना सांगितले .शीतल नगर येथील गटारात पडून मरण पावलेल्या तरुणा प्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जात असल्याने आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ते बनवण्याचे काम करत होतो असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले . तर मनसैनिकांनी मात्र तुम्ही बाटली , ग्लास खाली फेकला हे आम्ही पहिले असून ते उचलून आणत अधिकाऱ्यांना दाखवले .त्यातच प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या तोंडावरचा मास्क आधी कार्यकर्त्यांनी काढायला लावला . नंतर बोलाचाली झाल्या असता कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांना मारहाण व शिवीगाळ केली . पोलिस घटनास्थळी आल्यावर सर्वाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले . पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी साठी मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले .काशिमीरा पोलीस कार्यालयात गेले असता दारू पीत होते वा तसा काही पुरावा कार्यालयात आढळला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले . तर अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच फिर्यादी नंतर गुन्हा दाखल केला जाईल असे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले .
मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 9:04 PM