नितिन पंडीतभिवंडीतील माणकोली अंजूरफाटा ते चिचोटी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी बुधवारी कामण खारबाव व कालवार अशा तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी भिवंडी तहसीलदार कार्यालयात पोलीस व महसूल प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीच्या प्रतिनिधींची गाव विकास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत २० दिवसाच्या आत रस्त्याची कामे पूर्ण करून रस्त्यावरील खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत करण्याचा इशारा सुप्रीम कंपनीला देण्यात आला होता.
मात्र या रस्त्याच्या प्रश्नाकडे आता मनसेने लक्ष वेधले असून रस्त्याच्या दुरावस्थे बाबत गुरुवारी दुपारी टोल नाक्यावर धाड टाकून या मार्गावरील मालोडी येथे असलेला सुप्रीम कंपनीचा टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद केला. जोपर्यंत रस्त्याची आवश्यक कामे पूर्ण होत नाही तसेच रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत होत नाही तोपर्यंत टोल नका सुरु करायचा नाही, जर त्याआधी टोल नाका सुरु केला तर मनसे स्टाईलने आंदोलन करून टोल नाक्याची तोड फोड करू असा सज्जड दम वजा इशारा यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यानी सुप्रीम टोल कंपनीला दिला आहे.
भिवंडीतील मानकोला अंजूरफाटा चिंचोटी या राज्य महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून सध्या रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरते दुर्लक्ष होत आहे. या पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत असून अनेकांचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे.