कल्याण : मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या चढ्या दरानं होणारी विक्री आणि बाहेरील खाद्यपदार्थांना असलेल्या बंदीविरोधात न्यायालयाने फटकारल्यानंतर आता मनसेनेही याविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई, ठाण्यापाठोपाठ आज कल्याणामध्येही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले. बाहेरून आणलेला वडापाव मल्टिप्लेक्समध्ये खात मनसेने आणत आपला निषेध नोंदवला.कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात असणाऱ्या मल्टिप्लेक्सवर आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली विक्रीदरांबाबत राज्य शासनाने नियमावली आखून दिली आहे. मात्र, मल्टिप्लेक्स चालकांकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे सांगत या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली. तसेच लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर खळ्ळखट्याक स्टाईलने त्याचे उत्तर दिले जाईल, असा इशाराही मनसेकडून यावेळी मल्टीप्लेक्स प्रशासनाला देण्यात आला. या आंदोलनात मनसे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात मनसे आक्रमक; कल्याणमध्ये आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 6:41 PM