ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात असलेल्या एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या विरोधात बुधवारी मनसेने आंदोलन केले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने कंपनी चे ठाणे कार्यालय आठ दिवसांत बंद करण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला.
या खाजगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कर्ज देण्यात आलेल्या व्यक्तींना अपशब्द वापरले जात असल्याचा दावा यावेळी मनसेने केला. या संदर्भात मनसेने यापूर्वी देखील १० ते १२ वेळा आंदोलन केले असल्याची माहिती जाधव यांनी दिली. परंतु त्यानंतरही कंपनीकडून तशाच प्रकारचे कृत्य सुरु असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने अप शब्द वापरले, अशी तक्रार एका महिलेने केली होती.
महिलेने कॉम्प्युटरसाठी फायनान्स घेतला होता, मात्र तीन ते चार महिन्याचे पैसे न दिल्याने त्यांना कॉल करुन सतावले जात होते. एजंट हिंदीत बोलत असून त्यांनी मराठीतच बोलावे, असे ते म्हणाले. त्यामुळे या फायनान्स कंपनीला ठाण्यातील व्यवसाय बंद करून कार्यालय हटवावे असा इशारा त्यांनी दिला आहे. आठ दिवसात कार्यालय बंद केले नाही तर मनसे आपल्या स्टाईलने हे कार्यालय बंद केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने मनसे कार्यकर्त्यांना आत जाता आले नाही.