कल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते प्रशासनाकडून भरण्यात येत नाहीत. त्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी डोंबिवलीतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील रस्त्यावर खड्ड्यांत बसून आंदोलन केले. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे, तरीही प्रशासनाकडून खड्डे भरले जात नाहीत. दरवर्षी गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून होते. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरले जावे, यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने हे आंदोलन केले.
घरत म्हणाले की, रस्ते विकासासाठी ३६० कोटी रुपये मंजूर झाले असे फलक शहरात लावले जातात. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. मनपा दरवर्षी खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते. मागील वर्षी १७ कोटी रुपये मनपाने खर्च केला होता. यंदाही अशा प्रकारचा खर्च दाखविला जाईल. मात्र, रस्त्यांवरील खड्डे तसेच असतील, अशी टीका केली.
----------------