ठाणे : चंदनवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर गेले तीन दिवस कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे पडून असल्याने बुधवारी सकाळी मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी चक्क या ढिगाऱ्यात बसून आंदोलन केले. आंदोलनानंतर जाग येताच ठाणे महापालिकेने हे ढीग उचलून नेले.
चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पडझड झाली. चंदनवाडी येथेही झाड पडून त्याचा पालापाचोळा पडून होता. तसेच, याठिकाणी कचऱ्याचे ढीग ही साचू लागले होते. पाऊस पडत असल्याने या कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली होती. तीन दिवसांपासून कदम हे ठाणे महापालिकेला कचरा उचलून नेण्यासाठी विनवणी करीत होते. परंतु, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याठिकाणी ढीग साचत गेला. कदम यांनी बुधवारी सकाळी या कचऱ्यात खुर्चीवर बसून राहिले. जोपर्यंत पालिकेचे कर्मचारी हा कचरा उचलून नेत नाही तोपर्यंत इथेच बसून राहण्याची भूमिका कदम यांनी घेतली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने कर्मचारी पाठवून तो कचरा उचलून नेला. ठाणे महापालिकेला कचरा उचलण्याचे सांगितल्यावर ते आपली जबाबदारी झटकत होती. यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी या आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला, असे त्यांनी सांगितले.
---------------
फोटो मेलवर