- नितिन पंडीत भिवंडी - सध्या महाराष्ट्रात विविध शहरांचे नामकरण करून श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षाचे राजकारणी सक्रिय झाले आहेत.अशातच महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडीच्या वतीने देखील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करण्याचे लेखी पत्र भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना देऊन नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभारी नियुक्त्या येत्या १३ ऑगस्टपर्यंत रद्द कराव्यात.अन्यथा १५ ऑगस्ट रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर महानगर प्रभारी महानगरपालिका करणार आहे. असा थेट इशारा मनसे कामगार सेना युनिटचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष साळवी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
५ सप्टेंबर २०१८ च्या नियमाप्रमाणे अतिरिक्त कार्यभार सोपवताना मार्गदर्शक सूचनांच्या नियमांची मनपा प्रशासनाकडून पायमल्ली झाली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शासनाच्या नियम व शर्तींचा भंग करत मनपा शिक्षण विभागातील नियुक्त्या शैक्षणिक अहर्ता नसताना,कॅडर नसताना,त्या विभागाचा अनुभव नसताना,वेतन समतुल्य नसताना देखील प्रभारी नियुक्त्या शिक्षण विभागाबरोबरच अन्य ठिकाणी झाल्या असून त्यातून आता भिवंडी मनपाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असल्याची टीका देखील मनसेने केली असून मनपा प्रशासक तथा आयुक्त म्हासाळ हे देखील या नियम बाह्य पद्धतीने प्रभारी पद दिलेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे असून या नियबाह्य प्रभारी अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई आयुक्त करत नसून अशा अधिकाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत असून सध्या भिवंडी महानगरपालिकेत संपूर्ण विभागात जवळपास ७० टक्के प्रभारी पद नेमण्यात आली असून भिवंडी मनपाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे.
त्यामुळे करदात्या भिवंडीकर जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेची कामे अडकुन पडली आहेत.नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेला हा कारभार तात्काळ बंद व्हावा यासाठी संतोष साळवी यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून आपल्या मागण्यांचे पत्र आयुक्तांना दिले असून १३ तारखेपर्यंत जर त्यांनी ज्या प्रभारी नियुक्त्या रद्द नाही केल्या नाही तर १५ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर प्रभारी महानगरपालिका करण्यात येईल अशी माहिती युनिटचे कार्यध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली आहे.