ठाणे : महापालिका निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा असताना दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. गुरुवारी यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच हल्ला झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज मनसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील बंडखोरी व राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात विविध कारणांमुळे धुसफुस सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत राज यांनी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्ताने दोन दौरे केले. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार ९ मार्च रोजी गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करतील.
संघर्षाची तयारी... पुन्हा एकदा भरारी मनसेचे नेते अविनाश जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी... पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जात होत्या. राज यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर अनेक मशिदींवरील भोंगे उतरविले गेले. आता राज सत्ताधारी व विरोधक यांचा कसा समाचार घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.