बदलापूर : लसीकरणातील गोंधळाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत मनसेने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपहासात्मक सत्कार केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीने याच मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला असून कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख व डॉक्टर सेलचे डॉ. अमोल गोईलकर यांनी नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयात जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश व डॉ. पाटोळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. कोरोनाच्या संकटकाळात डॉ. अंकुश व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रुग्णसेवेत दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण केले जावे अशी सरकारची भूमिका असून त्यासाठी नगरपालिका प्रशासनही प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. लसीकरण मोहिमेत सुसूत्रता, पारदर्शकता असली पाहिजे जेणेकरून लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला लस मिळाली पाहिजे. यादृष्टीने नगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अविनाश देशमुख यांनी केली. काहीवेळा लसीकरण मोहीम राबवताना काही त्रुटी राहू शकतात. त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. सध्याच्या काळात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
बदलापूर नगरपालिका हद्दीत सध्या लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. शहरात चार ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली असून लसीकरणासाठी नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे चार वाजल्यापासून नागरिक लसीकरणासाठी रांगा लावतात. मात्र विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आलेल्या लोकांना लसीकरणासाठी मध्येच प्रवेश दिला जात असल्याने टोकन घेऊनही तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मनसेचे शहराध्यक्ष जयेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांचा उपरोधिक सत्कार केला होता. त्यांनतर बुधवारी राष्ट्रवादीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.