वज्रेश्वरी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली आहे. शासनाने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी म्हणून आणि सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भिवंडी तालुक्याच्या वतीने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सरकारचे डोके ठिकाणावर नाही ते घरात बसले आहेत, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. पण आपल्याला बाहेर पडावेच लागते नाही तर, आपलं पोट भरणार नाही आणि मंदिरे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो जणांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे शासनाने सर्व मंदिरे उघडण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी हा घंटानाद करण्यात आला. याचा आवाज सरकारच्या कानी पोहोचेल आणि मंदिरे खुली करण्याची सुबुद्धी देव त्यांना देईल, असे यावेळी ठाणे जिल्हा संघटक मदन आण्णा पाटील यांनी सांगितले. शासनाने दारूची दुकाने खुली केली आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात झुंबड उडते. मग भक्त मंदिरामध्ये शिस्तीत रांगेत दर्शन घेतात, इतर राज्यातील मंदिरे खुली आहेत, मग महाराष्ट्रातील मंदिरे बंद का? असा प्रश्न उपस्थित केला..
यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, सचिव संजय पाटील, तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, शहर अध्यक्ष मनोज गुळवी उपस्थित होते.